कैलास गायकवाड
लोणी, (पुणे) : शेतकऱ्यांचे प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना मंचर पोलिसांनी त्वरित अटक करावी. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली.
मंचर (ता. आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट), शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टीच्या वतीने सभा घेण्यात आली. त्यात बांगर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश बालवडकर, गणेश खानदेशे, वैभव टेमकर, माऊली ढोमे आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब बाणखेले, वनाजी बांगर, सचिन बांगर, अशोकराव काळे, अॅड. सचिन बेंडे पाटील, राजू घोडे, अमोल वाघमारे, अमरसिंह कदम, अजीत चव्हाण यांची भाषणे झाली.
या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे बंद पाळण्यात आला. आरोपीवर कारवाई होत नाही तो पर्यंत अनेक गावांमध्ये रास्ता रोको, गाव बंद आंदोलन केले जाईल. असा इशारा शेतकरी सेघटनेचे वनाजी बांगर व युवासेनेचे राष्ट्रिय सरचिटणीस सचीन बांगर यांनी दिला.
दरम्यान, पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांची कार्यकर्त्यांनी भेट घेतली त्यावेळी ते म्हणाले की, प्रभाकर बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार योग्य तपास करून कार्यवाई केली जाईल.
मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना मारहाण केल्या प्रकरणी ऋषी वर्पे रा. कळंब ता. आंबेगाव, संतोष माशेरे, रा. एस कॅार्नर मंचर व इतर आठ अनोळखी जणांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकलहरे (ता. आंबेगाव) येथे मोटार सायकल वर येऊन बेकायदा गर्दी जमाव करून हातात काठ्याघेऊन प्रभाकर बांगर व वनाजी बांगर यांना मारहाण केली. वळसे पाटील व देवेंद्र शहा यांच्या विरूद्ध आंदोलन करतो काय ? पुन्हा असे कृत्य केल्यास जीवे मारणार असे या फिर्यादित म्हटले आहे.
बांगर हल्ल्यात वडीलांचा आत्महत्येचा प्रयत्न..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समजताच त्यांचे वडील गोपाळा बांगर ( वय 85 ) यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी (ता. ०३) सकाळी त्यांनी राहत्या घरी किटकनाशक सदृश्य औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रूगालयात उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी मंचर उपजिल्हा रूग्णालयात त्यांचे नातू आकाश बांगर यांचा जवाब घेतला आहे. पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.