पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. त्यातच एका व्यक्तीने पोलिस चौकीमध्येच पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
नवनाथ कचरू लोखंडे (वय २६ रा. डोमखेलरोड, वाघोली) असे या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी घरी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस शिपाई मुकेश अशोक पानपाटील (वय ३१) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी (दि.१) दुपारी साडेबारा महात्मा फुले पोलिस चौकीत दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला आहे. किरकोळ वादातून नवनाथची पत्नी त्याला सोडून माहेरी राहायला आली होती. नवनाथ याने तिला नांदण्यास येण्यासाठी सांगितले, मात्र ती नांदायला येण्यास नकार दिला. त्याचा राग मनात धरून बुधवारी (दि. १) सकाळी याचा जाब विचारण्यासाठी तो सासुरवाडीला गेला होता. मात्र, घरी कोणी नसल्याने त्याने पत्नीला फोन करून विचारले असता तिने महात्मा फुले पोलिस चौकीत असल्याचे नवनाथला सांगितले.
दरम्यान, नवनाथ पोलिस चौकीमध्ये दाखल झाला. पोलिस चौकीत जाताना त्याने एका प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल नेले होते. त्याठिकाणी झालेल्या वादातून नवनाथने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.