Mumbai Crime मुंबई : मुंबईच्या मालाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबोजवाडी परिसरातील जमावाकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तसेच मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर देखील जमावाकडून हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे.
आरोपी आणि मृत पावलेला तरुण हे दोघेही शेजारी राहणारे आहेत. आरोपी गोविंद चव्हाण आणि उज्जा चव्हाण हे दोघे शेजारी राहतात. या दोघांमध्ये दारू पिण्यावरून किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची माहिती आहे. या हाणामारीत उज्जा चव्हाण हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या जमावामध्ये महिलांचाही समावेश होता. मारहाणीची घटना सुरू असताना बघ्यांची मोठी गर्दी होती. मात्र, कोणीही या मारहाणीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
सदर मारहाणीची माहिती पोलिसांना कळवण्यात आली होती. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील जमावाकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी जमावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी गोविंद चव्हाण याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान, मालवणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.