पुणे : थकीत वीजबिल न भरल्याने महावितरणने ग्राहकावर कारवाई करून विद्युत पुरवठा तोडला. याचा राग मनात धरून एकाने महावितरणच्या अधिकाऱ्याला रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना विमाननगर (पुणे) परिसरातील पराशर सोसायटीत बुधवारी (ता. २१) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सुशील जालिंदर नवले (वय ३५, रा. नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश विठ्ठल इंडे (वय ३९) असे जखमी झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश इंडे हे महावितरणाच्या शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तर आरोपी सुशील नवले हा नगर रस्ता परिसरात राहतो. आरोपीने गेल्या काही महिन्यांपासून महावितरणाचे वीजबिल भरले नव्हते. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वेळोवेळी विद्युत बिल भरण्यासाठी विनंती केली होती.
त्यानंतर, इंडे हे शाखा कार्यालयामार्फत ते पराशर सोसायटीत वीजबिल भरणा न करणाऱ्या ग्राहकांची माहिती घेण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपी सुशील नवले यांनी वीजबिल भरले नव्हते. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा तोडण्यात आला.
दरम्यान, विद्युत पुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून नवले यांनी घरातून स्टीलचा रॉड आणून ने इंडे यांना मारहाण केली. आमच्या भागात आला तर त्याचे हात-पाय तोडीन, अशी धमकीही त्याने दिली. या मारहाणीत इंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास विमानतळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक पाठक करीत आहेत