पुणे : कामावरुन घरी जाणाऱ्या तरुणीचा कारमधून पाठलाग करत शिवीगाळ करत तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना खेड तालुक्यातील महाळुंगे येथील भैरवनाथ नगर येथे बुधवारी (ता. १५) रात्री दहाच्या सुमारास घडली.
विकास राकेस सरवदे (वय. २५, रा. चिखली), राजेश रामदास पाटोळे (वय. २८, रा. निगडी), ज्ञानेश्वर बाबुराव वैरागे (वय. ३६ रा. कृष्णा नगर), आकाश मोकींद कांबळे (वय. २३, रा. रुपीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्य़ादी या कामावरुन पायी घरी जात असताना आरोपींनी चारचाकी गाडीतून त्यांचा पाठलाग केला. आपला पाठलाग केला जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी घाई-घाईत खोलीवर गेल्या. त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला असता आरोपी विकास याने दरवाजा ठोठावला.
तसेच मला तुझ्यासोबत बोलायचे आहे दरवाजा उघड असे सांगितले. मात्र फिर्यादी यांनी त्याच्यासोबत बोलण्यास नकार देऊन निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी विकास सरवदे याने फिर्यादी यांच्या खोलीच्या दरवाजावर हाताने मारुन अश्लिल शिवीगाळ करुन घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्य़ादी यांनी पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे यांना फोन करुन याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपींना ताब्यात घेतले. तसेच आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.