Mahabaleshwar News पाचगणी : गेली दोन दिवस पाचगणी व परिसरात संततधार पाऊस पडत आहे. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासुद्धा वाहत आहे. (Mahabaleshwar News) या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दांडेघर (ता.महाबळेश्वर) येथील एका राहत्या घरावर गुरुवारी (ता.२०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सिल्व्हरचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने झाड स्वरंक्षक कठड्याला अडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. (Mahabaleshwar News)
मुसळधार पावसाने पाचगणी परिसरास चांगलेच झोडपले आहे. तसेच संततधार सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता वाई – पाचगणी रस्त्याच्या वरच्या बाजूस असलेल्या विष्णू पांडुरंग कळंबे, सुरेश विष्णू कळंबे आणि श्रीमती कलावती किसन कळंबे यांच्या नावे असलेल्या राहत्या घरावर गुरुवारी (ता.२०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सिल्व्हर वृक्षाचे झाड कोसळलेआहे. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
झाड मोठे आणि उंच असल्याने घराचे छत, कौले, लाकडाच्या तुळव्या, भिंत असे सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. सदर झाड स्वरंक्षक कठड्याला अडल्याने मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, सध्या पावसाचे दिवस असल्याने या कुटूंबाचा संसार उघड्यावर डला असून शासनाने गरिब कुटुंबाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच सदर घटनेचा पंचनामा महसूल विभागाच्या मार्फत मंडल अधिकारी चंद्रकांत पारवे, तलाठी दीपक पाटील यांनी केला आहे.