लोणी काळभोर : घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला लोणी कंद पोलिसांनी केसनंद (ता. हवेली) रस्त्यावरील जोगेश्वरी मिसळ जवळून अटक केली आहे.
लोकेश रवि पाटील (वय-२२, रा. पाटील वस्ती केसनंद गाव, ता हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ७ गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी तब्बल २ लाख ७७ हजार ७३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटना वारंवार वाढत होत्या. याप्रकरणी नागरिकांनी लोणी कंद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या पथकाला सूचना दिल्या होत्या.
लोणी कंद पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तपास करीत असताना, पथकातील पोलीस नाईक अजित फरांदे व पोलीस अमलदार साईनाथ रोकडे यांना घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या अट्टल लोकेश पाटील हा केसनंद गाव (ता. हवेली) येथे शुक्रवारी (ता. ३० सप्टेंबर) येणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने केसनंद (ता. हवेली) रस्त्यावरील जोगेश्वरी मिसळ परिसरात नाकाबंदी केली. आणि आरोपी लोकेश पाटील याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी लोकेश पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरी व घरफोडी केली असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६ दुचाकी व घरफोडी गुन्हयातील माल असा एकुण २ लाख ७७ हजार ७३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार,पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, अजित फरांदे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, साईनाथ रोकडे, अमोल ढोणे, पांडुरंग माने, दिपक कोकरे आणि आशिष लोहार यांच्या पथकाने केली आहे.