लोणी काळभोर : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळून शनिवारी (ता.२७) मध्यरात्री अटक केली आहे.
अभिजीत अभिमन्यू अहेरकर (वय-२१ रा. कन्या शाळेच्या पाठीमागे, लोणी काळभोर ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर, जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला आरोपी अभिजीत अहेरकर हा कवडीपाट टोल नाक्याजवळ येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार राजेश दराडे यांना मिळाली होती. सदर माहिती वरिष्ठांना सांगून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथकाने तडीपार सराईत गुन्हेगारास कवडीपाट परिसरातुन पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी अभिजीत अहेरकर याच्यावर विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीला २ वर्षा करीता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार केले होते. अहेरकर याला अटक केल्यानंतर त्याच्या विरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ कारवाई केली आहे.
सदरची कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस अंमलदार राजेश दराडे, नितेश पुंडे आणि विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे.