लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी व मारामारी याच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी कांचन येथून बेड्या ठोकल्या आहेत.
प्रज्वल नामदेव धवडे (वय-२३, रा. भिगवण ता. इंदापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर लोणी काळभोर पोलिसांनी या अगोदर रोहीणी भातुलकर, तौफीक शेख, मंगेश कानकाटे, शुभम कानकाटे, साईराज कानकाटे, रुतुराज कांचन, बंटी आमले, प्रतिक लांडगे, एक अनोळखी इसम, सर्व रा. ऊरुळी कांचन (ता. हवेली) यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रज्वल धवडे हा फरार होता.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस अंमलदारांना आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार निखील पवार व बाजीराव वीर यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदरचा फरार आरोपी प्रज्वल धवडे हा उरुळी कांचन येथील महात्मा गांधी शाळेजवळ येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांना सदर गोष्टीची माहिती देऊन त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी तपास पथकासह गेले असता सदर आरोपीला पोलीस आल्याची चाहूल लागताच त्या ठिकाणावरून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करुन त्यास थोडयाच अंतरावर शिताफीने पकडले. त्याला नाव विचारले असता त्याने वरीलप्रमाणे सांगितले व सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, पुंडे यांचे पथकाने केली आहे.