जनार्दन दांडगे
लोणी काळभोर (पुणे) : भेकराईनगर येथील जनावरांच्या डॉक्टरने सोडून दिलेली त्याची पहिली पत्नी, दुसऱ्या पत्नीची धाकटी भावजय व भावजयीचा प्रियकर यांनी घडवून आणलेले डॉक्टरचेच अपहरण आणि त्याच्याकडून उकळलेली २७ लाखांची खंडणी… एखाद्या बॉलिवूडच्या थ्रीलर चित्रपटालाही लाजवेल असे कथानक असलेल्या गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तपास करुन, खंडणी उकळणारी एक महिला, एक तृतीयपंथी व चार तरुण अशा सहा आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
राहुल दत्तु निकम (वय २७, रा. शहा, ता. इंदापूर, जि. पुणे) हे या प्रकरणातील मास्टरमाईंड असून, लोणी काळभोर पोलिसांनी राहुल निकम, त्याची प्रेयसी विद्या नितीन खळदकर (वय ३५, रा. ढगेमळा, कुर्डुवाडी रोड, ता. बार्शी, जि. सोलापूर) हिच्यासह राहुलचे सहकारी माऊली ऊर्फ ज्ञानदेव महादेव क्षिरसागर (मुळ रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर, जि. पुणे, सध्या रा. मु. पो. शेंद्री, ता. बार्शी, जि. सोलापूर), नितीन बाळू जाधव (वय २५, रा. मु. पो. शहा, ता. इंदापूर, जि. पुणे), सुहास साधु मारकड (वय २८, रा. मु. पो. पडस्थळ, ता. इंदापूर), संतोष धोंडीबा गोंजारी ऊर्फ राणी पाटील (तृतीयपंथी, वय ३४, रा. मूळ जगलबेट, ता. जोथाडा, जि. कारवार, कर्नाटक, सध्या. मु. पो. लोणी देवकर, ता. इंदापूर) या सहा जणांना मोठ्या शिथाफीने अटक केली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी वरील सहा आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रेनॉल्ट कंपनीची क्विड कार, मारुती स्विफ्ट डिझायर कार, बजाज प्लॅटीना मोटारसायकल, हिरो कंपनीची स्पोर्टस बाईक, तक्रारदार यांचा फोडून फेकून दिलेला मोबाईल हॅंन्डसेट तसेच आरोपींचे वापरात असलेले एकूण ६ मोबाईल हॅंन्डसेट, सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात लुटलेली १२ लाख रुपये रोख रक्कम असा एकुण २२ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान डॉ. प्रदीप मारुती जाधव हे अपहरण झालेल्या फुरसुंगी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. कुत्रे आजारी असल्याच्या बहाण्याने वरील सहा जणांनी क्राईम पेट्रोलमधील कथानकाला लाजवेल, असे नियोजन करुन डॉक्टरांचे वडकी येथून ९ ऑगष्ट रोजी अपहरण केले होते. अपहरणानंतर डॉक्टरांना एका नंबर प्लेट नसलेल्या चारचाकी क्वीड कंपनीच्या गाडीत जबरदस्तीने बसवून, गाडी दिवेघाट मार्गे वाघापूर हद्दीतील वणीकरण्याच्या जागेत नेऊन मारहाण केली. मारहाणीदरम्यान डॉक्टरांना तुमच्या पत्नीने व मेहुण्याने तुम्हाला मारण्याची सुपारी दिली असल्याचे खोटे कथानक त्यांना ऐकवले होते.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रदीप जाधव यांना दोन बायका असून, त्यांनी पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिलेली आहे. तर डॉ. जाधव दुसऱ्या पत्नीसह फुरसुंगी हद्दीतील भेकराईनगर येथे राहण्यास आहेत. पहिल्या पत्नीच्या केस दरम्यान न्यायालयाने डॉक्टरांना २५ लाख रुपयांची एकरकमी पोटगी देण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम देण्यासाठी डॉक्टरांनी घरी रोख रक्कम आणली होती. दरम्यान, ही रक्कम देण्यासाठी डॉक्टरांनी पहिल्या पत्नीशी संपर्क साधला. या वेळी त्यांची दुसरी पत्नी माहेरी म्हणजे बार्शी येथे गेली होती. तिला पैसे घरात आणल्याची बाब माहिती होती. दरम्यान, बोलता बोलता तीने ही बाब तिच्या माहेरच्या लोकांबरोबरच, तिची भावजय विद्या नितीन खळदकर हीला देखील सांगितली.
दरम्यान, विद्याचे राहुल निकम (रा. इंदापूर) याच्यासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध सुरु होते. विद्याला राहुलसोबत संसार करायचा होता. पण पैशाची अडचण असल्याने, राहुल विवाह करण्यास टाळाटाळ करत होता. विद्याने नंनदेच्या नवऱ्याकडे म्हणजेच डॉक्टरच्या घरात २५ लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती देताच, राहुल व विद्याने वरील प्लॅन आखला व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अंमलातही आणला.
लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या कौशल्यामुळे व पोलीस अंमलदार संभाजी देवीकर, श्रीनाथ जाधव, बाजीराव वीर व शैलेश कुदळे यांच्या साह्याने तांत्रिक विश्लेषण केल्यामुळे वरील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.