लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा या रस्त्यावरील पदपथावरील दिव्याच्या खांबावर बेकायदेशीर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीने उभारलेल्या पदपथावरील दिव्याच्या खांबावरच विविध प्रकारच्या जाहिरातींचे फ्लेक्स लावण्यात आल्याने जाहिरातदार व फ्लेक्स छापणारे अशा दोघांवर कारवाई केली जाणार आहे. या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी दिले आहेत.
कवडीपाट ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा या रस्त्यावर पदपथावरील दिव्याच्या खांबावर फ्लेक्स लावल्याचे दिसून येते. या फ्लेक्समुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भातील लेखी पत्र लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ व कुंजीरवाडी या सहा ग्रामपंचायतींना गुरुवारी दिले असून, फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या कामासही तात्काळ सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती दत्तात्रेय चव्हाण यांनी दिली.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ व कुंजीरवाडी या सहा ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीत रस्त्यांमधील दुभाजकांवर नागरिकांच्या सोयीसाठी पदपथावर दिवे लावले आहेत. ग्रामपंचायतींनी उभारलेल्या या दिव्यांच्या खांबावर जाहिराती करता येत नसतानाही पूर्व हवेलीमधील अनेक हौसे-गवसे फ्लेक्स लावून आपापल्या जाहिराती करत आहेत. मात्र, जाहिरातींसाठी लागलेले फ्लेक्स रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांना विशेषतः दुचाकीचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे दिसून आले. रस्त्यावर पडलेल्या फ्लेक्समुळे छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे.
…तर जाहिरातदारासह फ्लेक्स बनविणाऱ्यांवर कारवाई
याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण म्हणाले, ‘रस्त्यांमधील दुभाजकांवर ग्रामपंचायतीने उभारलेल्या पदपथावरील दिव्यांच्या खांबावर लागलेले फ्लेक्स पडून वाहनचालकांना विशेषतः दुचाकीचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. अशाप्रकारे खांबावर फ्लेक्स लावणे नियमबाह्य आहे. संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. कवडीपाट ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा या दरम्यान रस्त्यांमधील दुभाजकांवर लावलेल्या जाहिराती अथवा फ्लेक्स पुढील 24 तासांच्या आत न काढल्यास संबंधित जाहिरातदार व फ्लेक्स बनविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे’.