विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील पंधरा नंबर ते उरुळी कांचन या वीस किलोमीटर अंतराच्या टप्प्यात वाहतूक कोंडी व छोटे-मोठे अपघात होणे ही बाब नित्याचीच झाली आहे. फक्त लोणी काळभोरसाठीच जवळपास ४० वाहतूक पोलिस आहेत, मात्र ते काम सोडून पठाणी वसुलीत दंग असतात. परिणामी, चौकाचौकात रोजच वाहतुक कोंडी होत असते. यामुळेच ‘वाहतूक पोलीस आहेत नावाला, काम करतात कुण्या गावाला?’ असा सवाल लोणी काळभोरच्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या नेमणुका कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर करण्यात आलेल्या आहेत. वाहतूक पोलीस सकाळी हजेरी लावून जातात, ते नंतर थेट संध्याकाळच्या सुमारास नियुक्तीच्या ठिकाणी दिसत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
दरम्यान, लोणी स्टेशन चौकात एक नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. ही शाळा दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुटते. त्यानंतर विद्यार्थी थेट सोलापूर महामार्ग ओलांडण्यासाठी स्टेशन चौकात येतात. त्यावेळी तिथे वाहतूक पोलीस उपस्थित असणे आवश्यक आहे. परंतु, वाहतूक पोलीस नसल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एखादा मोठा अपघात घडल्यावरच पोलीस प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल लोणी काळभोर ग्रामस्थांकडून केला जात आहे.
साहेब आणि कर्मचारी फक्त सेल्फी काढण्यातच दंग..
लोणी काळभोर वाहतूक शाखेचे अधिकारी सकाळच्या सुमारास त्यांच्या हद्दीच्या परिसरात मोठ्या थाटात फिरतात. सेल्फी काढत समाधान मानून निघून जातात. मग, नागरिकांना सेवा देणार कोण? वाहतूक पोलिस हे वाहतूक कोंडी सोडवण्याच्या ऐवजी भर रस्त्यात जाऊन गाडी अडवत पठाणी वसुली करत असल्याचे दिसून येत आहे.
…तर पोलीस नेमकं करतात तरी काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या ठिकठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. वाहतूक पोलीस सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जर उपाययोजना करत नसतील, तर पोलीस करतात काय? त्यामुळे ‘वाहतूक पोलीस आहेत नावाला, काम करतात कुण्या गावाला?’ असं म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
फोन नंबर दिल्यास साहेब होतात ‘इरिटेट’
लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या एका अधिकाऱ्याला वाहतुकीच्या संदर्भातील सर्वसामान्य नागरिक समस्या सांगतात. त्यानंतर ते संबंधित अधिकाऱ्याला म्हणतात, साहेब समस्या सांगण्यासाठी तुमचा नंबर द्या. तेव्हा साहेब म्हणतात, ‘मी फोन नंबर कोणालाही देत नाही. मी इरिटेट होतो…’ मग वाहतुकीच्या समस्या नागरिकांनी नेमकं सांगायच्या कोणाला? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
आडोसा किंवा ‘सुरक्षित’ ठिकाणीच बस्तान..
सध्या बहुतांश चौकात वाहतूक पोलिस हे वाहतूक नियमन सोडून आडोशाला थांबत असल्याचे चित्र आहे. इतकेच नाही, तर काही वाहतूक पोलिस हे दुचाकी किंवा बाकड्यावर बसल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. जर वाहतूक पोलिसच अशाप्रकारे ‘सुरक्षित’ जागा शोधत असतील, तर सर्वसामान्यांसह वाहनचालकांची सुरक्षा रामभरोसेच, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर व लोणी स्टेशन चौकात रिक्षा रस्त्यावरच लावल्या जातात. त्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात होतात. एमआयटी कॉर्नरच्या चौकात मालधक्क्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक पुणे सोलापूर महामार्गावर येते. महामार्गाकडे येताना चढ लागत असल्याने, चौकात नेहमी वाहतूक कोंडी होते. या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांकडून चिरीमिरी घेऊन गप्प झाले का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.