लोणी काळभोर,(पुणे) : लोणी काळभोर गावात असलेल्या एका नामांकित शाळेत निघालेल्या एका १५ वर्षीय मुलीवर अज्ञात दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन ब्लेडसदृश वस्तूने वार केल्याची घटना घडली. या घटनेत मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेत जखमी मुलीला ८ टाके पडले असल्याची माहिती मुलीच्या पालकांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना दिली.
पाषाणकर बाग ते साई मंदिर परिसरात गुरुवारी (ता. ३०) सकाळी दहा ते सव्वा दहा वाजण्याच्या ही सुमारास घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, संताप व्यक्त केला जात आहे. हल्लेखोराने चोरीचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे हल्ल्यामागे अन्य कोणते कारण आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगी ही नेहमीप्रमाणे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कन्या प्रशाला या ठिकाणी निघाली होती. सकाळी शाळेत जात असताना पाठीमागून एका दुचाकीवर दोघेजण आले व मुलगी जात असताना पाठीमागे बसलेल्या एकाने मुलीच्या हातावर ब्लेडसदृश वस्तूने वार केला.
दरम्यान, याचवेळी पाठीमागून तिची एक मैत्रीण आली व तिने सदरचा घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. यावेळी पालक तत्काळ मुलीजवळ पोहोचले व त्यांनी सदर मुलीला लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार झाले असून, तिला आठ टाके पडले आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.