लोणी काळभोर, (पुणे) : पुरंदर विधानसभेचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांच्या शेतातील १३ हजार रुपये किमतीचा साडेचार टन उभा ऊस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी संभाजीराव रामचंद्र कुंजीर (वय – ७३, रा. मुकुंदनगर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांची शेती आहे. या शेतात २६५ या जातीच्या उसाचा खोडवा आहे. या उसातील १३ हजार ५०० रुपयांचा अंदाजे साडे चार टन उस त्यांच्या संमती शिवाय अज्ञात चोरटयांनी १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान चोरुन नेला आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय जाधव करत आहेत.