लोणी काळभोर, (पुणे) : शेळीच्या लहान पिल्ल्याला दगड मारल्याच्या कारणावरून चुलत चुलत्याने पुतण्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उरुळी कांचन येथे घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चुलत्यासह आणखी दोघांवर गुन्हा करण्यात आला आहे.
रामदास बोलू बगाडे, प्रज्वल सतीश बगाडे आणि श्रेयस सतीश बगाडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी विनायक प्रभाकर बगाडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत बगाडे मळा परिसरात रामदास बगाडे, प्रज्वल बगाडे व श्रेयस बगाडे हे राहत आहेत. तसेच त्यांच्याच बाजूला विनायक बगाडे व त्यांचे कुटुंबीय राहण्यास असून विनायक यांचे रामदास हे चुलत चुलते आहेत. विनायक बगाडे यांच्याकडे काही शेळ्या आहेत. यावेळी बगाडे यांच्या शेळीच्या लहान करडाला दगड मारला होता.मंगळवारी (ता. १७) दगड का मारल्याचा जाब विचारायला गेले होते.
दरम्यान, दगड मारल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून विनायक बगाडे यांच्या दुकानाच्या बाहेर बोलावून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी बगाडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.