विशाल कदम
उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावरील हडपसर ते भिगवण या दरम्यान असलेले लॉजींग हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले आहेत. या मार्गावरील लॉजींगच्या नावाखाली खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु आहेत. गेल्या महिन्यात उरुळी कांचन जवळील बोरिभडक (ता. दौंड) येथील नक्षत्र लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच, आता जॉली लॉजिंगवर वेश्या व्यवसायाचा पर्दापाश करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. यवत पोलिसांनी गुरुवारी (ता.3) छापा टाकून पीडितेची सुटका केली आहे. तर पोलिसांनी लॉज चालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉजचालक प्रभाकर गुलाब मदने (वय-३६ रा. भोसरी, जि. पुणे. मुळ रा. बोरी, पोस्ट नारंगवाडी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद ) व उमेश ब्रम्हा शिंदे ( वय 35, रा. उरूळीकांचन आश्रम रोड, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी पोलीसनाईक निखिल रणदिवे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरिभडक (ता. दौंड) येथील जॉली लॉजिंगवर छुपा वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने यवत पोलिसांनी लॉजवर गुरुवारी (ता. 3 ) छापा टाकला. तेव्हा पोलिसांना या लॉजवर पिडीत मुलीला पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी पिडीत मुलीची सुटका केली आहे.
यवत पोलिसांनी लॉजची झाडाझडती घेतली असता ८ हजार ५३० रुपये ७० हजार रुपये किंमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, १८४ कंडोम पाकीट असा एकूण ९० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लॉज चालक प्रभाकर मदने व उमेश शिंदे यांच्यावर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे सोलापुर महामार्गावरील दौंड व उरुळी कांचनच्या सीमेवर असलेल्या बोरीभडक येथील नक्षत्र लॉजवर काही दिवसापूर्वी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली होती. आता यवत पोलिसांनी जॉली लॉजिंगवर वेश्या व्यवसायाचा पर्दापाश करून लॉजचालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. भिगवण, खडकी या परिसरातही वेश्याव्यवसाय करणाऱ्या लॉजींगवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामुळे पुणे – सोलापूर महामार्गावरील लॉजींग व्यवसाय खुलेआम वेश्याव्यवसायाचे अड्डे तर बनले नाहीत ना असा सवाल नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, पुणे सोलापूर महामार्गावरील वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई होत नसल्याने वेश्याव्यवसाय पुन्हा लगेच सुरु होत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करून वेश्याव्यवसाय कायमचा बंद करावा. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.