लोणी काळभोर, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झालेल्या १० लाख रुपयांच्या चोरीची उकल करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेला यश आले आहे. दोन सख्ख्या भावांनीच चुलत भावाच्या घरी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
करण उर्फ विकी अजित रणसिंग (वय-२८), व सुशिल अजित रणसिंग (वय ३२ वर्षे, रा. दोघेही इरिगेशन कॉलनी, दौंड ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्याच्या हददीतील इरिगेशन कॉलनी येथे घरातील सर्व सदस्य मिळून कार्यक्रमाकरीता बाहेर गेल्यानंतर त्यांचे घरातुन बाथरूमच्या खिडकीवाटे जाळी उचकटून अज्ञात चोरटयानी त्यांचे घरातील स्टील डब्यामधील ठेवलेले सोने चांदीचे दागिने गुरुवारी (ता. १६) चोरून नेल्याप्रकरणी प्रिया महेश रणसिंग यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस करीत असताना सराईत गुन्हेगार सख्या चुलत दिर करण उर्फ विकी अजित रणसिंग याचेवर संशय होता. यावेळी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता करण पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता.
सदरची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना समजली. सदर गुन्ह्याचे तपासकामी एक पथक नेमून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने करण याच्याकडे वेगवेगळया प्रकारे प्रश्न विचारून कौशल्यपूर्ण तपास केला असता करण उर्फ विकी अजित रणसिंग याने गुन्हा केल्याचे सांगितले व भाऊ सुशील याने गुन्हयातील मुददेमालाची विल्हेवाट लावण्याकरीता मदत केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, आसिफ शेख, विजय कांचन, मुकुंद कदम यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास महिला पोलीस उप-निरीक्षक सुनिता चवरे हया करीत आहेत.