सोलापूर : बनावट नोटांचं रॅकेट चालवणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला आणि त्याच्या साथीदाराला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुर्डूवाडी (ता. माढा) येथून ताब्यात घेतले आहे.
हर्षल शिवाजी लोकरे (वय २०, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि सुभाष दिगंबर काळे (वय ३६, रा. भोसरी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपींकडून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून लोकरे हा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्डूवाडी शहरामध्ये काही महाविद्यालयीन तरुण हे ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास कुर्डूवाडी शहरातील टेंभुर्णी चौकामध्ये सापळा लावला. त्यावेळी हर्षल लोकरे हा बनावट नोटा चलनात आणत असताना रंगेहात सापडला.
हर्षल लोकरे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला या बनावट नोटा सुभाष काळे याने चलनात आणण्यासाठी दिल्या असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ दुचाकीवर थांबलेल्या सुभाष काळे यास ताब्यात घेतले.
त्यावेळी काळे याच्याकडेही बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी हर्षल लोकरे व सुभाष काळे या दोघांनाही अटक केली. दोघांकडून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
दरम्यान, बनावट नोटांप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून या बनावट नोटांचे रॅकेट सुभाष काळे हा चालवत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. सुभाष काळे हा या बनावट नोटा कुठून आणत होता, या बनावट नोटांची छपाई कोठे होत होती, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि या रॅकेटच्या माध्यमातून बाजारात किती रुपयांच्या बनावट नोटा आलेल्या आहेत, या सर्व बाबींचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड, पिराजी पारेकर, नीलकंठ जाधवर, पोलीस हवालदार सर्जेराव बोबडे, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, सलीम बागवान, रवी माने, घोरपडे, दिलीप थोरात आदींनी केली आहे.