पुणे : सिंहगड रस्त्यावरील नवले पुलाजवळील ॲरो हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा सुमारे ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर तीन कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. #crime
मयूर प्रकाश माने (वय-२७, रा. साई द्वारिका सोसायटी, वडगाव), प्रणित संजय पोटपिटे (वय-२३, रा. दांगट पाटील नगर, शिवणे) आणि आदर्श अशोक गज्जर (वय-३०, रा. एनडीए रस्ता, उत्तमनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या कामगारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पुलाजवळ डेक्कन पॅव्हेलियन हॉटेल आहे. या हॉटेलच्या इमारतीतील छतावर ॲरो हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर आणि विशाल दळवी यांच्या पथकाने केली.