Leopard | मंचर, (पुणे) : रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका दुचाकीवर हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता. २०) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) परिसरात घडली आहे. या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बबन थोरात (वय – ५८) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय गायकवाड हे दुचाकी चालवत होते. तर बबन थोरात हे मागे बसले होते. कळंब येथे कामानिमित्त जात असताना चांडोली आणि कळंबच्या गावाच्या हद्दीवर मल्हार बंगल्याजवळ अचानकपणे बिबट्याने दुचाकीवर हल्ला करून बबन थोरात यांना जखमी केले. बिबट्याच्या हल्ल्यामुळे दुचाकीचालकाचे गाडीवर नियंत्रण सुटून दोघेही खाली पडले. त्या वेळी प्रसंगावधान राखत विजय गायकवाड यांनी स्थानिक शेतकर्यांना फोन करून मदतीसाठी बोलावले.
तुषार थोरात यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात जखमी बबन थोरात यांना वैद्यकीय उपचारासाठी आणले. बबन थोरात यांचा डावा पाय, उजवा हात आणि पाठीला पंजाने ओरखडून बिबट्याने जखमी केल्याचे दिसून आले.
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी सचिन कांबळे आणि सुहास कांबळे यांनी रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. मंचर वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन बबन थोरात यांची भेट घेऊन चौकशी व पंचनामा केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!