न्हावरे: शिरूर तालुक्यातील करडे गावात शनिवारी(ता.१८) मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या निखिल सतीश थेऊरकर याच्यावर जुन्या वादाच्या कारणातून गोळीबार करण्यात आला.जीव वाचवण्यासाठी त्याने भैरवनाथ मंदिराशेजारील तलावात उडी घेतल्याने तो थोडक्यात बचावला.या प्रकरणी सहा संशयितांविरुद्ध तपास सुरू असून, त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार,शुक्रवारी (दि.१७)रात्री निखिल थेऊरकर(वय-२३) हा पुणे येथील एलसीबी कार्यालयातून करडे(ता.शिरूर)येथील स्वतःच्या घरी दुचाकीवरून परतत होता. दरम्यान मध्यरात्री (ता.१८)अंदाजे १ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास भैरवनाथ मंदिर परिसरातून दोंडेवस्तीकडे जात असताना,गोलेगाव-करडे रस्त्यावर तीन मोटारसायकलींवर आलेल्या संशयितांनी त्याला जुन्या वादातून शिवीगाळ केली.त्यानंतर निखिलने दुचाकी वळवून पुन्हा भैरवनाथ मंदिर परिसरात येताच घटनाक्रमाने अचानक हिंसक वळण घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रात्री १ वाजून ३६ मिनिटांनी निखिल मोटारसायकलवरून उतरत असतानाच पहिला गोळीबार करण्यात आला.अचानक झालेल्या गोळीबारामुळे निखिलने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोटारसायकल घटनास्थळी सोडून भैरवनाथ मंदिराजवळील तलावाकडे धाव घेतली. मात्र, संशयितांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला.

निखिल तलावाकडे पळत असताना,संशयितांनी पिस्तुलातून आणखी एक गोळी झाडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.त्यानंतर निखिलने तलावात उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता,त्याच्यावर पाण्यातही गोळीबार करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने फिर्यादीमध्ये केला आहे.मात्र,सुदैवाने कोणतीही गोळी निखिलला लागली नाही.निखिल तलावातून पोहत दुसऱ्या बाजूला गेला आणि तेथून थेट दोंडेवस्तीवरील आपल्या चुलत्याच्या घरी पोहोचला.
घाबरलेल्या अवस्थेत त्याने संपूर्ण घटना चुलत्याला सांगितली. त्यानंतर घरातून ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना गोळीबाराची माहिती दिली.माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा, पुरावे संकलन आणि तपासाची प्रक्रिया सुरू केली.
या प्रकरणात अथर्व उर्फ टिन्या शेळके,रोहन पंचमुख,बबलू सोनलकर,आदित्य लंघे,आतिश गायकवाड आणि प्रेम देवकाते यांची नावे समोर आली असून, त्यांच्याविरुद्ध जुन्या वैमनस्यातून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, आरोपींना ताब्यात घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
घटनास्थळावरील पुरावे, गोळीबाराच्या खुणा, रिकामी काडतुसे,परिसरातील सीसीटीव्ही फुटेज,मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे.या सर्व पुराव्यांच्या आधारे हल्ल्यामागील नेमके कारण,वापरण्यात आलेले शस्त्र आणि घटनेतील प्रत्येक आरोपीची भूमिका स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
करडे गावातील ही घटना शिरूर तालुक्यातील वाढत्या गंभीर गुन्हेगारीची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ठरली आहे. मध्यरात्री गावाच्या मध्यवर्ती भागात झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान,या प्रकरणाचा तपास शिरूर पोलीस करीत असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच गोळीबारामागील नेमके कारण आणि संपूर्ण कट उघड होणार आहे.







