दौंड : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीला कच्चा माल पाठवतो म्हणून ४ लाख ३८ हजार ९६० रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार गुरुवारी (ता.२२) रोजी उजेडात आला. याप्रकरणी एकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश माधवराव वाकोडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकणी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर ओंकार चंद्रमोहन सावंत (वय २७ रा सावंत बंगला, गोपाळीवाडी रोड, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीत पीव्हीसी पाईप तयार होतात. त्यासाठी कंपनीला पीव्हीसी रेझीन हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात लागतो. गुरूवारी (ता. २२) फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनी मेलवर मरूधर इंटरनॅशनल फर्मवरून आकाश माधवराव वाकोडे यांनी मेलवरून कोटेशन पाठवून पीव्हीसी रेझीन हा कच्चा माल ९३ रूपये प्रति किलो प्रमाणे ४ हजार किलो देण्याचे ठरवले होते.
त्यानुसार फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीच्या (आयसीआयसीआय दौंड शाखा) खात्यावरून मरूधर इंटरनॅशनल फर्म याच्या एचडीएफसी बॅक (एसपी रिंग रोड अहमदाबाद) खात्यावर ४ लाख ३८ हजार ९६० रूपये आरटीजीएसच्या माध्यमातून कंपनीच्या खात्यावरून ऑनलाईन पध्दतीने पाठवले.
त्यांना पैसै पोहच झाल्यानंतर त्यांनी फिर्यादीला फोन करून गायत्री वेअर हाऊस पारसनाथ कॉम्प्लेक्स दापोडी भिवंडी जि. ठाणे येथे गाडी पाठवून देण्यास सांगितले.
दरम्यान, फिर्यादी यांनी आकाशला ट्रान्सपोर्टची गाडी पाठवली असे सांगितले. त्यानंतर आकाशने दहा मिनिटात सांगतो म्हणून फोन कट केला. नंतर फिर्यादी यांनी आकाशला अनेकवेळा केल्यावर फोन बंद लागला. यानंतर पैसे जमा होऊनही ठरलेला कच्चा माल फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीला पाठवला नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार आकाश वाकोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.