पिंपरी : पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने डोके वर काढले आहे. दरम्यान वाकड येथील फिनिक्स मॉलमध्ये घुसून कोयता गँगने माथाडी कामगारांना कोयत्याने मारहाण करून पैसे काढून घेतल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी (ता.३) दुपारी अडीचच्या सुमारास समोर आली आहे. या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकेश विनोद लखन (वय-२७ रा. खडकी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माथाडी कामगार असून ते व त्यांचे मित्र वाकड येथील फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी गेले होते. तेव्हा फिर्यादी व ते त्यांचे सहकारी अनिल कांबळे व प्रवीण पारखी यांच्यासोबत फिनिक्स मॉल गेट नं. ६ येथे उभे राहून गप्पा मारत होते. त्यावेळी सहा ते सात जण तोंडाला मास्क लावून गेटमधून आत आले.
त्यापैकी एकाने हातातील कोयता लाकडी टेबलावर मारुन हातातील दगडाने गार्ड केबीनची काच फोडली. तसेच सुरक्षारक्षक राजकिशोर यांना मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या एका आरोपीने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. तसेच हातातील कोयता हवेत फिरवुन दहशत निर्माण केली. कोयता गँगने माथाडी कामगारांना जीवे मारण्याची धमकी दिली व दगड मारुन जेसीबीची काच फोडली.
दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांचे सहकारी अनिल कांबळे व प्रविण पारखी यांच्या हातावर वार केले तसेच कांबळे यांच्या खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.