पुणे : मित्रानेच आपल्या मित्राचा अज्ञात कारणावरून खून करून त्याचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला लटकवून आत्महत्या भासवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हि घटना मंगळवारी (ता. २०) पहाटेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
परेश शंकर कंधारे ( वय २८ वर्ष, रा. स्मिता हाईट्स, लोकमान्य कॉलनी परमहंस नगर, कोथरूड) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर वसंत अवसारे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत परेशचे मामे भाऊ कुंदन बापू अडसूळ (वय- ३६ वर्ष रा. सागर कॉलनी , कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. मंगळवारी आरोपी वसंत आणि मयत परेश हे दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. त्यानंतर या दोघांमध्ये अज्ञात कारणावरून भांडण झालं. हे भांडण इतक्या टोकाला गेलं की आरोपी वसंतने परेशचा गळा दाबून त्याचा खून केला.
त्यानंतर हा खून वाटू नये आणि पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने शालीच्या सहाय्याने परेशचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला लटकवला. हा सगळा प्रकार मंगळवारी पहाटे चार ते बुधवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडला.
दरम्यान, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून खून झाल्याचे समोर आले. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे सुचित झाले आहे. सखोल तपास केल्यानंतर अवसारेला अटक केली असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस राठोड करत आहेत.