पुणे : वीज बिल भरले नसल्याने तुमचा विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल, असा मेसेज पाठवून त्यांनी संपर्क साधल्यावर त्यांना क्वीक सपोर्ट अॅप डाऊनलोड करायला सांगून कोंढव्यातील ८ जणांची साडेसहा लाख रुपयांची एकाचवेळी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका ४४ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना घरी असतना त्यांना एमएसईबी येथून कुमार बोलत असल्याचे सांगून तुमचे लाईट बिल भरणे बाकी असा फोन आला. बिल न भरल्यास तुमची इलेक्ट्रसिटी कनेक्शन कट करण्यात येईल असे सांगितले. तेव्हा त्यांनी आम्ही दोन तीन दिवसांपूर्वीच लाईट बील भरल्याचे सांगितले
त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही भरलेल्या बिलाची रक्कम आमच्या अकाऊंटवर दिसत नाही़ असे सांगून बिलाची पावती ऑनलाईन पाहण्यासाठी एमएसईबीचे एक अॅप डाऊनलोड करा. असे सांगतिल्यानंतर फिर्यादी महिलेने ती लिंक डाऊनलोड केली. त्या लिंकमध्ये विजेचे भरलेले बिल दिसत होते.
फिर्यादी महिलेला भरलेले वीज बिलाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे की नाही हे पाहण्यासाठी आणखी एक क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले़ व त्यानुसार त्यांनी ते डाऊनलोड करुन बँकेची माहिती भरली. तसेच त्यांना अॅपमध्ये १०० रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी १०० रुपये पाठविल्यावर त्यांच्याकडील अॅपमध्ये १०० रुपये जमा झाल्याचे दिसले. त्यानंतर समोरील व्यक्तीने फोन कट केला.
दरम्यान, काही वेळाने त्यांना आयडीबीआय बॅकेतून फोन आला. तुमच्या अकाऊंटवरुन १६ हजार रुपये तुम्ही कोणाला पाठवले आहे असे विचारुन तुमच्या खात्यावरुन कोणीतरी अज्ञात व्यक्ती पैसे काढण्याचा वारंवार प्रयत्न करत असल्याचे नोटीफिकेशन येत असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांची आपली फसवणूक करण्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली.
तेव्हा त्यांच्या प्रमाणेच कोंढवा परिसरातील इतर आणखी ७ जणांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. एकूण ८ जणांची ६ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याघटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.