Kishor Aware | पुणे : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून सामाजिक काम करत होते. जनसेवा विकास सेवा आघाडीच्या माध्यमातून ते तळेगाव येथे राजकारणात देखील सक्रीय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि त्यांच्या कार्यकर्ते यांच्यात वाद होत असत.
दरम्यान, मागील सहा महिन्यांपासून किशोर आवारे यांनी आमदार शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांच्या आईला सांगितले होते. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२२ रोजी फिर्यादी यांच्या वाहन चालकाला सुधाकर शेळके आणि त्यांच्या साथीदाराने जातीवाचक शिवीगाळ केली होती.
त्यानंतर किशोर आवारे हे त्यांचा मित्र संतोष शेळके यांच्यासोबत फिरत असल्याची बाब सुनील शेळके आणि त्यांच्या भावाला आवडत नसे. संतोष शेळके यांना किशोर आवारे सतत मदत करत असत. म्हणून सुनील शेळके आवारे यांच्यावर चिडून असे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
किशोर आवारे यांनी मागील दोन वर्षांपासून स्वत:चा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना राजकीय विरोध केला. चुकीच्या कामाबाबत वेळोवेळी निदर्शने केली. या रागातून तसेच त्यांचे राजकीय वर्चस्व वाढू लागल्याने आमदार शेळके यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास किशोर आवारे नगरपरिषद कार्यालयात गेले असता तिथे श्याम निगडकर आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारले असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आमदार सुनील शेळके यांच्यासह ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!