शिक्रापूर : हातात कोयता घेऊन मी ‘किंग ऑफ शिक्रापूर आहे’ असे म्हणत पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) परिसरात दहशत माजविणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.
सुरज विष्णू शितोळे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीमंत सर्जेराव होनमाने (रा. शिक्रापूर,ता. शिरुर) यांनी सरकारच्या वतीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे एक युवक हातामध्ये कोयता घेऊन ‘मी किंग ऑफ शिक्रापूर’ आहे. माझ्या नादाला लागले तर कापून टाकीन असे म्हणून कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, पोलीस शिपाई जयदीप देवकर यांचे एक पथक तयार करताना आरोपीला पकडण्याच्या पथकाला सूचना दिल्या. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने आरोपी सुरज शितोळे याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून पोलिसांनी कोयता जप्त केला.
दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी सुरज शितोळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल दांडगे करीत आहे.