पुणे : लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवन नं. ३ ता. (मावळ) येथे दारू पिऊन झालेल्या भांडणामध्ये वृद्धाचा खून त्याच्याच मुलाने केला आहे. सहा दिवसानंतर या वृद्धाच्या खुनाचा उलगडा करण्यास लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
खंडू उर्फ गोटया भिकाजी गिरंजे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शेखर खंडू उर्फ गोटया गिरंजे (वय -३५ रा. खडकपाडा बारवेगांव, शिवपाडा, एकविरा मंदीराचे बाजूला ता. कल्याण पश्चिम, जि. ठाणे. मुळ रा. जवन नं. ३ ता. मावळ) असे खून करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी मयताचा भाऊ सखाराम भिकाजी गिरंजे वय -६७ रा. जवन नं. ३, ता. मावळ जि. पुणे. सध्या रा. सिंहगड रोड, साई मंदिराशेजारी, ४ था मजला, अ विंग, फ्लॅट नं. १२, पुणे) यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवन नं. ३ ता. मावळ ग्रामपंचायत हद्दीत गुरुवार ते रविवार (ता. १४ ते १७ दरम्यान खंडू उर्फ गोटया भिकाजी गिरंजे व शेखर खंडू उर्फ गोटया गिरंजे यांचेमध्ये दारु पिवून झालेल्या भांडणामध्ये शेखर गिरंजे याने वडील खंडू उर्फ गोटया गिरंजे यांचा गळा दाबून जिवे ठार मारुन त्याचा खून केला असावा अशी फिर्याद मयताचा भाऊ सखाराम भिकाजी गिरंजे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यानुसार सदर घटनेचा तपास करीत असताना शेखर गिरंजे याला लोणावळा पोलिसांनी वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व बुध्दी कौशल्याने बोलवून त्याच्याकडे सदर खुनाची चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार सोमवारी (ता. १८) शेखर खंडू उर्फ गोटया गिरंजे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कामगीरी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने, सचिन राऊळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे,पोलीस हवालदार विजय गाले, सिताराम बोकड, संतोष शेळके, नितीन कदम, शरद जाधवर, केतन तळपे, संदिप बोराडे, प्रणयकुमार उकिर्डे यांनी केली आहे.