पुणे : येथील एका व्यापाऱ्याचे खरेदीच्या बहाण्याने आलेल्या अज्ञान लोकांनी अपहरण केले . त्यानंतर त्याला वसई येथील जंगलात सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात व्यापाऱ्याला जंगलात सोडणाऱ्यापैकी एकाला हडपसर पोलिसांनी राजस्थानांतील पाली येथून अटक केली आहे. प्रेम संबंधातून हे अपहरण करण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात व्यापाऱ्याने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.
कैलासराम सोहनलाल जाट (वय ३५, रा. पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार तिकाराम खोत, भंवर जाखड, गाविंद (सर्व रा. जालोर, राजस्थान) यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्याचे मांजरी येथे दुकान असून बुधवारी (ता. २३) नोव्हेबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याच्या दुकानात तिघे जण आले होते. व्यापाऱ्याला मारहाण करून त्यांनी मोटारीतून त्याला पळवून नेले.
वसई विरार टोलनाक्याजवळील जंगलात पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्याला सोडून ते निघून गेले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास केल्यावर त्यातील एक संशयित राजस्थानातील पाली येथे असल्याचे कळाले. तपास पथकाने पाली येथे जाऊन कैलासराम जाट याला पकडले. त्यातून अपहरणामागील कारण स्पष्ट झाले.
दरम्यान, व्यापाऱ्याचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहे. या तरुणीचे नातेवाईक राजस्थानमध्ये राहत असून त्यांना याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करून त्याचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.