पाटणा : शासकीय सेवेत असताना नेटफ्लिक्स व फ्रायडे स्टोरी टेलर या दोन कंपन्यांशी व्यवसायिक करार केल्याने बिहारच्या विशेष दक्षता विभागाने आयपीएस अधिकारी अमित लोढा यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली खाकी : द बिहार चॅप्टर ही वेब सिरीज आयपीएस अधिकारी अमित लोढा यांच्या पुस्तकावर बेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिहार येथील विशेष दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मगध विभागाचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक अमित लोढा यांच्या विरोधात भ्रष्टाचार, वैयक्तिक स्वार्थ व लाभ तसेच अनियमितता यांच्या आरोपांची चौकशी करण्याचे निवेदन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते.
त्यानुसार नेटफ्लिक्स व फ्रायडे स्टोरी टेलर या दोन कंपन्यांसोबत व्यावसायिक संबंधांची देखील चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे विशेष दक्षता पथकाने म्हटले आहे.
अमित लोढा अजूनही शासकीय सेवेत आहेत. व्यवसायिक लेखकाला एखाद्या निर्मिती संस्थेशी किंवा कंपनीशी करार करता येऊ शकतो मात्र, शासकीय अधिकाऱ्याला असा करार करता येवू शकत नाही.
अमित लोढा याना १२ हजार ३७२ रुपये मिळाले असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्या पत्नी कौमुदी याच्या खात्यावर ३८. २५ लाख रुपये जमा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बेकायदेशीर कराराला कायदेशीर करण्यासाठी निर्माते व कौमुदी यांच्या करार करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हणण्यात आले आहे.
अमित लोढा यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत आयपीएस निवडले होते. त्यांना बिहार केडर मिळाले असून ते १९९८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. बिहारमध्ये काम करताना त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर बिहार डायरी पुस्तक लिहिले आहे.
नागरिकांशी ते थेट संवाद साधल्यामुळे ते त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्ध अधिकारी म्हणून नावारूपास आले होते. त्यांनी अनेक नागरिकांच्या तक्रारी जागेवर सोडविल्यामुळे ते बिहार कार्यक्षेत्रात चांगलेच लोकप्रिय झाले होते.