कर्जत : घराबाहेर झोपलेल्या वृद्ध ७५ वर्षीय महिलेचा गळा दाबून, मारहाण करून कानातील व गळ्यातील दागिने बळजबरीने चोरून नेणाऱ्या, तसेच दरोडे व बळजबरीने चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोखरणा अभिमान काळे, (वय-२४, रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळवडी (खानवटेवस्ती) येथे २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेला मारहाण करत बळजबरीने महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केली होती. याबाबत ठकूबाई लाला खानवटे (वय ७५ वर्षे) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
ठकूबाई खाणवटे यांचा मुलगा बबन खानवटे याने नवीन घर बांधल्याने व घराची अध्याप वास्तुशांती न झाल्याने फक्त फिर्यादी नव्या घरात झोपण्यासाठी जात होत्या. २५ ऑगस्टला ठकबाई या घराच्या पोर्चमध्ये झोपल्या असताना मध्यरात्री बाथरूमसाठी उठल्या असता उशाला ठेवलेली बॅटरी मिळून आली नाही. त्यावेळी घरातून दोन इसम बाहेर आले आणि फिर्यादीचा गळा दाबून चापटीने मारहाण केली. ‘आरडाओरडा करू नको नाहीतर ठार मारीन’ अशी धमकी देत गळ्यातील सोन्याच्या मण्याची माळ, कानातील सोन्याची फुले असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल बळजबरीने ओढून नेला.
तसेच रविवारी (ता. ०४) सप्टेंबर रोजी गौतम अनिल डोंडे (मूळ रा. भालु खोंदरा ता. लोरमी जि. मुगेली छत्तीसगड) सध्या कानगुडवाडी (ता. कर्जत) हे मजुरीचे काम करतात. ते बांधकाम व्यावसायिक बिभीषण काळे (रा. परीटवाडी) यांच्याकडे गेली सहा महिन्यापासून कामाला आहेत. कानगुडवाडी शिवारात बंगल्याचे काम सुरू असल्याने फिर्यादी व इतर लोकांना राहण्यासाठी त्या ठिकाणी पत्र्याचे घर तयार करण्यात आले आहे. रविवारी काम करून आल्यानंतर रात्री १० वाजता आतून कडी लावून सर्वजण झोपी गेले होते. पहाटे १ वाजता दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. उशाजवळ ठेवलेला स्वतःचा व इतरांचे असे ३ मोबाईल व साहित्य ही गायब असल्याचे समजल्याने फिर्यादीने जोडीदारांना विचारले मात्र मोबाईल आढळून आला नाही. १७९९० रु. किमतीचे मोबाईल चोरी गेल्याची खात्री झाल्यावर फिर्यादीने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
कर्जत पोलिसांनी सदरचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने गोपनीय माहिती काढून पोखरणा काळे याला ताब्यात घेतले व सखोल विचारपूस केली. यावेळी या दोन्ही घटनेतील मुद्देमाल त्याचे साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली पोखरणा काळे याने दिली. राशीन येथेही त्याने घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीवर जबरी चोरी घरफोडी चोरी तसेच मारहाण करणे असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, पोलीस जवान श्याम जाधव, पांडुरंग भांडवलकर, गोवर्धन कदम, भाऊ काळे, अर्जुन पोकळे, संपत शिंदे यांनी केली आहे.