कर्जत : व्यापाऱ्याची १० लाखाची रक्कम चोरणाऱ्या दोन हमालांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमनाथ विठ्ठल साळुंखे (वय-२७), व प्रमोद विजय आतार (वय-१९, रा. दोघेही कोरेगाव ता. कर्जत) अशी दोन हमालांची नावे आहेत. यापैकी प्रमोद आतार याला पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर लगेच ताब्यात घेतले होते. तर सोमनाथ साळुंखे हा तेव्हापसुन फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष रविंद्र कोठारी (रा. कर्जत) यांचे शेतकरी मार्केट कर्जत येथे आडत दुकान आहे. शेतकऱ्यांकडुन खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी कर्जत येथील अर्बन बॅंकेतून त्यांनी दहा लाखांची रोकड आपल्या ताब्यात घेऊन ती बॅगमध्ये ठेऊन मोटार सायकलवर मार्केटकडे येत होते.
कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांच्याच दुकानात हमालीचे काम करणारे कामगार सोमनाथ साळुंखे व प्रमोद आतार या दोघांनी सदर रोख रक्कम पळवून नेल्याची तक्रार पियुष कोठारी यांनी कर्जत पोलिसात मंगळवारी (ता. ०४) दिली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर प्रमोद आतारला यापूर्वीच अटक केले होते. परंतु सदर प्रकारातील दुसरा आरोपी सोमनाथ साळुंखे हा तेव्हापासून फरार होता त्यास गजाआड करण्यात कर्जत पोलिसांना यश आले.
फरार आरोपी हा कर्जत तालुक्यात रात्री उशिरा दाखल झाला असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून कर्जत पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सदर आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून गावठी बनावटीचे २५ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
सदर आरोपीवर पिस्तूल आणि काडतूस बाळगल्याबद्दल वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. आरोपीस माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांच्या समक्ष हजर केले असता त्यांनी चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, अनंत सालगुडे, पोलीस जवान शाहूराज तिकटे, उद्धव दिंडे, सलीम शेख प्रवीण अंधारे यांनी केली आहे.