न्हावरे : करडे (ता.शिरूर) येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या २२ वर्षीय तरूणाने छताच्या लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ऋषिकेश दिलीप लगड (वय २२, मु. पो. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश, आई-वडील व भाऊ निलेश यांच्यासोबत करडे येथील घरी राहत होता. मंगळवारी (दि.३१) रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपले होते. परंतु, ऋषिकेश शेजारील रूममध्ये एकटाच झोपला होता. दुसऱ्या दिवशी (दि.१) सकाळी ६ वाजता निलेश कामावर गेला.
कामावर पोहोचला असतानाच त्याच्या वडिलांनी ऋषिकेशने गळफास घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर ऋषिकेशचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेततून खाली घेण्यात आला. मात्र, शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऋषिकेशला मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेचा पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ चव्हाण करत आहेत.