पुणे : भाडेकरूने ६० वर्षीय महिलेचा फ्लॅट बनावट दस्त तयार करून बळकविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शहरातील गुरुनानकनगर येथून समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भाड्याने फ्लॅट रहायला दिला असताना वकिलाला हाताशी धरुन जुन्या स्टॅम्पपेपरवर बनावट दस्त तयार करुन फ्लॅट बळकविण्याचा प्रयत्न भाडेकरूने केला. ही बाब लक्षात येताच महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी रियाज मोहम्मद हुसैन शेख (वय ५२) मुमताज रियाज शेख (वय ५०, दोघे रा. गंगा अव्हेन्यू) आणि अॅड. सुधीर श्रावण सोनवणे (वय ५५, रा. साईनाथ नगर, पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार उंड्री येथील रोजवुड सोसायटीत १५ जून ते १८ जुलै २०२२ व १० जानेवारी २०२३ मध्ये घडला.
फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीचा फ्लॅट आरोपी रियाज शेख याला १० फेब्रुवारी २०२२ ते ९ जानेवारी २०२३ असा ११ महिन्यांच्या लिव्ह अँड लायसन्स रजिस्टर करार करुन दिला होता. शेख याने नोटरी करणारे वकिल सोनावणे यांना हाताशी धरुन २०१९ सालचे ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपरवर ११ डिसेबर २०१६ ते १२ डिसेबर २०२३ असे ६० महिन्यांचे बनावट लिव्ह अँड लायसेन्स नोटराईज अॅग्रीमेंट बनवले.
त्यामध्ये फिर्यादीचे फ्लॅटसाठी ३० लाख रुपये रोख दिल्याचे खोटे नमूद केले. या दस्तावर फिर्यादीचा एकत्रित फोटो लावून दस्त करताना फिर्यादी हजर नसताना, त्यावर फिर्यादी व फिर्यादीचे पती यांच्या बनावट सह्या करून खोटा दस्तऐवज बनवून फिर्यादीची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.