Junnar Crime News जुन्नर पुणे : दुचाकीचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून एकाला पाचजणांकडून बेदम मारहाण ; उपचारादरम्यान मृत्यू, तिघांना बेड्या, दोघे फरार..
जुन्नर, (पुणे) : गावयात्रेतील तमाशा पाहण्याकरिता निघालेल्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून पाच जणांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुणाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. तर तीन जण फरार आहेत.
जिजाराम रामदास सुपे (वय – ३९, रा. आंबेहातविज, ता. जुन्नर) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी राहुल रमेश शिंदे, तुषार जयवंत खरात, शुभम सुरेश डामसे, संकेत सुनिल डोळस व एक अल्पवयीन मुलगा (सर्वजण रा. इंगळून, ता. जुन्नर) यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीताराम सुपे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
सीताराम व जिजाराम हे दोघेजण दुचाकीने मंगळवारी (ता. १८) आंबेहातविज येथून घाटघर येथे तमाशा पाहण्याकरिता जात होते. त्या वेळी इंगळून येथून हे पाच तरुण रस्त्याने पायी जात असताना एकाला या दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे चिडून जाऊन या पाच जणांनी मिळून दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
जिजाराम याला लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केल्याने जखमी अवस्थेत त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेतील पाच जणांपैकी दोघांना अटक करण्यात आली असून, यामधील अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे, तीन फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार, अंमलदार वाल्मिक शिंगोटे करीत आहेत.