पुणे : आर्थिक व्यवहारातून एका व्यक्तीचे अपहरण करुन आठ लाखांची मागणी करणाऱ्या आरोपींना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वानवडी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट क्रमाक चारच्या पोलिसांनी संयुक्त तपास करुन अपहरण झालेल्या व्यक्तीची सुमारे १२ ते १४ तासात सुटका केली.
दत्तात्रय श्रीराम वारिंगे (वय.३९, रा. तळेगाव दाभाडे), महेश ब्रह्मदेव जाधव (वय. ३२, रा. वाघेला पार्क कॉलनी, तळेगाव दाभाडे), सुभाष गोपाळ सोनजारी (वय. ४०, रा. नाचकेंड वस्ती, तळेगाव दाभाडे), रवी हनुमंत अंकुशी (वय. ३४, रा. सोनझरी वस्ती, तळेगाव स्टेशन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रविण शशिकांत पाटील उर्फ मोहमंद परवेझ शेख (वय. 39, रा. लोहगाव बस स्टॉप जवळ, पुणे) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मेव्हण्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण पाटील उर्फ मोहम्मद शेख आणि आरोपी यांचे आर्थिक व्यवहार होते. आर्थिक व्यवहारतून आरोपींनी पाटील यांना वानवडी येथील फातिमानगर चौकातील श्री सागर हॉटेल येथे बोलावून घेतले. त्याठिकाणी त्यांना मारहाण करुन अपहरण करुन घेवून गेले.
त्यानंतर आरोपींनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन करून आठ लाख रुपयांची मागणी केली. याप्रकणी अपहरण झालेल्या प्रविण शशिकांत पाटील उर्फ मोहमंद शेख यांच्या मेव्हण्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रार प्राप्त होताच आरोपींचा शोध सुरु केला.
दरम्यान, आरोपींनी पाटील यांना तळेगाव दाभाडे येथे घेवून गेल्याची माहिती मिळाली. वानवडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका करुन चार जणांना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.