Jejuri News जेजुरी (पुणे : जेजुरीच्या पूर्व भागातील Jejuri News नाझरे जलाशयाच्या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अचानक बिबट्याचे दर्शन…!
नाझरे जलाशयाच्या परिसरात नाझरे कडेपठार, नाझरे सुपे ही खेडी असून या परिसरारील ग्रामस्थांना गेल्या आठवड्यापासून बिबट्या दिसू लागला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती असल्याने अचानक बिबट्याचे दर्शन कधी रस्त्यावर, शेताच्या बांधावर होऊ लागल्याने शेतकरी वर्गही धास्तावला आहे.
अनेकांना या बिबट्याचे दर्शन झाल्याने रात्रीच्या वेळी शेतकरी बाहेर पडायला घाबरू लागले आहेत. ऊस शेती असल्याने बिबट्या नेमका कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहे, याचा थांगपत्ता लागत नसल्याने या दोन्ही गावांबरोबर आजूबाजूच्या गावांतूनही दहशत पसरू लागली आहे.
दरम्यान, वनविभागाकडून याबाबत ठोस पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून तसेच पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी केली आहे.