शुभम वाकचौरे
Shirur News : जांबूत : घरासमोरील अंगणात झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वृद्धाच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत. ही घटना बेल्हे (ता. जुन्नर) गुळंचवाडी येथे घडली. बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी फड यांनी प्राथमिक उपचार केले. आळे येथील बालकावरील हल्ल्यामुळे संपूर्ण जुन्नर तालुका हादरून गेला असतानाच आता ज्येष्ठ नागरिकावर बिबट्याने हल्ला केला आहे.
ज्येष्ठ नागरिकावर बिबट्याचा हल्ला
सोमवारी (दि. ९) गुलुंचवाडी येथील धायटे मळा येथे आपल्या घरासमोरील अंगणात झोपलेल्या नामदेव भाऊ काळे या वृध्द व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला. यावेळी काळे यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या धूम ठोकून पळाला. पण नामदेव काळे यांच्या डोक्याला दुखापत करूनच पळाला. या हल्ल्याची माहिती मिळताच वनरक्षक संजय नरळे आणि वनकर्मचारी जे. टी.भंडलकर यांनी ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे आणि बेल्हे वन परिमंडल अधिकारी निलम ढोबळे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब नामदेव काळे यांना उपचारासाठी बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
बिबट्याकडून दररोज होताहेत पाळीव प्राण्यांवर हल्ले
बिबट्याकडून दररोज बळीराजाच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला केला जातो. त्यामुळे जनता हवालदिल झाली. संपूर्ण अणेमाळशेज पट्ट्यातील गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. सध्या बिबट्यांची संख्या वाढली असून, दिवसाढवळ्या बिबटे वाड्यावस्त्यांसह गावातील चौकात फिरताना दिसून येतात. त्यामुळे या ठिकाणी वास्तव्य करणे अवघड झाले आहे. याशिवाय हल्ल्यात एखादी व्यक्ति अथवा बालक दगावल्यास २४ तासांच्या आत वनविभाग त्याच बिबट्याला जेरबंद करत असेल. तर इतरवेळी बिबट्या वनखात्याच्या पिंजऱ्यात सापडत कसा नाही ? असा सवाल गुळंचवाडीचे माजी तंटामुक्ति अध्यक्ष सागर जाधव यांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यात लसींचा तुटवडा ?
बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी फड यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जुन्नर येथे घेऊन गेले. पण तेथेही रॅबिज लस उपलब्ध नसल्यामुळे नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घरी सोडण्यात आले. संपूर्ण जुन्नर तालुका बिबट प्रवणक्षेत्र असूनही गावोगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसते. ही फार मोठी शोकांतिका आहे. आम्हाला गावपातळीवरील वनकर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळते. पण प्रशासनाकडून बिबट्याचे पूर्णपणे निवारण करण्यासाठी दुर्लक्ष होते, जर एखाद्या व्यक्तीस ताबडतोब उपचार मिळाले नाही. आणि काही विपरीत घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? तसेच प्रशासनाला बिबट्या महत्वाचा की माणूस महत्वाचा? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नरचे कार्याध्यक्ष अतुल भांबरे यांनी उपस्थित केला.