जालना : जाफराबाद (जि. जालना) येथील ॲड. किरण लोखंडे यांच्या खुनाचे गूढ उलघडायला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. पत्नीनेच तिचा प्रियकर व मित्राच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी खुनाच्या गुन्हातील फरार असलेल्या एका आरोपीला साताऱ्यातून अटक केली आहे.
विकास गणेश म्हस्के असे (रा. वाल्हा, ता. बदनापूर, जि. जालना) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर यापुर्वी पोलिसांनी पत्नी मनीषा लोखंडे आणि तिचा प्रियकर गणेश आगलावे यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा लोखंडे आणि ॲड. किरण लोखंडे यांचा विवाह मे २०२२ ला झाला होता. दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. यातूनच मनीषाने तिचा प्रियकर गणेश आगलावे व विकास म्हस्के यांच्या मदतीने पतीचा काटा काढायचा ठरवले. आणि ऍड. किरण लोखंडे यांच्या डोक्यात लोखंडी पाइपने मारहाण करून ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री खून केला. आणि नाक व तोंड दाबून ठार मारले. खुनानंतर मृतदेह घरातच ठेवून घराला कुलूप लावून आरोपी निघून गेले..
त्यानंतर खुनाच्या दुसऱ्या दिवशी आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरातील सिलिंडरचा पाईप काढून रेग्युलेटर चालू करून काडी लावली. त्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात वकिलाचा मृत्यू झाला. असल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामा केल्यानंतर अनेक संशयास्पद बाबी असल्याचे समोर आले. आणि या स्फोटात मृतदेह पूर्ण जळाला नाही व शवविच्छेदनात अनेक गोष्टींचा उलगडा झाला.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांकडे विचारपूस केली असता कोडे उलगडत गेले. पत्नी मनीषा लोखंडे आणि तिचा साथीदार गणेश आगलावे यांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. आणि आरोपींना जालना पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
हि उल्लेखनीय कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष तासगावकर, फौजदार अमित पाटील, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, मोहन पवार, गणेश कापरे, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव यांच्या पथकाने केली आहे.