Pimpri News : पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि परिसरात चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच दुचाकी चोरणाऱ्या जळगावातील टोळीला वाकड पोलिसांनी थेरगावातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडून पाच लाखांच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. एवढेच नव्हे कर संबंधित चोरांकडून दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.(Pimpri News)
चोरांकडून दहा गुन्हे उघडकीस.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश भागवत परदेशी (वय २२), शुभम राजेंद्र निकम (वय २०), पुष्पक दिलीप पाटील (वय २३) आणि प्रज्वल लालजी भोसले (वय २४, सर्व रा. चिंचवड, मूळ चाळीसगाव, जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.(Pimpri News)
वाकड पोलीस थेरगाव परिसरात गस्त घालत होते. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी चोरटे थेरगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. पोलीस दिसताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी दुचाकींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. वाकड, चिखली, येरवडा, पिंपरी, चिंचवड परिसरातून दहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून पाच लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.(Pimpri News)
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत. पार्किंगची व्यवस्था नसल्यास चेन, कुलूप लावावे. जीपीएस यंत्रणा बसवून घ्यावी. वाहने सोसायटी, कंपनी, मॉल, दुकानांच्या बाहेर रोडवर लावू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.(Pimpri News)