कर्जत : जलालपूरचा सावकार लयच मोठा ठग! मुद्दल व व्याजासहित ९ लाख गिळले, तरीही जमीन परत न करता, उलट अडीज लाख मागून त्रास देणाऱ्या सावकार व त्याच्या मुलावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी सावकार पोपट गणपत काळे व त्याचा मुलगा भाऊसाहेब पोपट काळे (दोघेही रा. जलालपूर, ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शंकर सर्जेराव घोंगडे (वय-२९ रा, जलालपूर) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर घोंगडे यांनी ६ जुलै २०१९ला जमीन खरेदी करण्यासाठी खाजगी सावकार पोपट काळे यांच्याकडून ६ लाख रुपये ३ रु. टक्के व्याजदराने घेतले होते. त्याबदल्यात घोंगडे यांच्या नावावर असलेल्या जमीनीपैकी २० गुंठे जमीन सावकाराचा मुलगा भाऊसाहेब काळे याच्या नावावर मुद्दल व व्याजाची रक्कम परत दिल्यानंतर पुन्हा नावावर करण्याच्या बोलीवर दिली होती.
जमिनीचा ताबा हा घोंगडे यांच्याकडेच असून त्यांनी त्या शेतजमिनीवर सन २०१९ ते २०२२ कालावधीत डाळींबाचे पीक घेतले होते. डाळींब विक्रीतून ७ जुलै २०२० रोजी व्याजापोटी सावकार पोपट काळे यांना दिड लाख रुपये रोख दिले होते. त्यानंतर पुन्हा १ जानेवारी २०२१ रोजी द्राक्ष विक्रीचे पैसे आल्याने सावकाराला ५ लाख रुपये रोख मुद्दल स्वरूपात दिले. त्यानंतर ३० जुलै २०२२ रोजी स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर फायनान्स करून अडीच लाखाची रक्कम मुद्दल व व्याजापोटी सावकाराला दिली. असे ३ लाख व्याजाचे व मुद्दालीचे ६ लाख असे एकूण ९ लाख रुपये खाजगी सावकार पोपट काळे यांना दिली.
दरम्यान, घोंगडे हे १७ सप्टेंबर रोजी शेतात काम करत असताना, सावकार पोपट काळे व मुलगा भाऊसाहेब काळे तेथे आले व म्हणाले, ‘आमचे उरलेले व्याजाचे अडीच लाख रुपये दे’ त्यावर घोंगडे म्हणाले ‘मी आत्तापर्यंत ९ लाख पोहोच केले असून तुमच्याकडे तारण ठेवलेली जमीन मला माझ्या नावावर करून द्या’ घोंगडे यांनी असे म्हणल्याचा राग आल्याने सावकारांनी अश्लील शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर ताबा असलेल्या शेतात जात टोमॅटो पिकाला जोडणी केलेले ठिबक काढून उपसून फेकून दिले व पीव्हीसी पाईप फोडून नुकसान केले.त्यानंतर ‘आमचे व्याजाचे पैसे परत दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन निघून गेले. फिर्यादीने दोन्हीही खाजगी सावकारांच्या विरोधात फिर्याद दिली असून कर्जत पोलिसांनी ४४७, ३२३, ५०६, ३४ तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित पोलीस हवालदार संभाजी वाबळे, अर्जुन पोकळे, मनोज लातूरकर आदींनी केली आहे
दरम्यान, कर्जत तालुक्यातील खाजगी सावकारकीला पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यामुळे चांगलाच चाप बसला आहे. अनेक सावकारांनी कारवाईच्या भीतीपोटी केवळ मुद्दल घेऊन तसेच परस्पर तडजोडी करून सावकारकीला कायमचा ‘रामराम’ घातला आहे. मात्र व्याजाच्या रकमेला तारण म्हणून दिलेली जमिनीची जुनी प्रकरणे आता यादवांच्या ‘यादवीमुळे’ बाहेर निघू लागली आहेत.