पुणे: पहिला प्रेम विवाह केल्यानंतर दुसऱ्यांदा प्रेमात पडलेल्या पतीने अडसर ठरणाऱ्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक पुण्यातील मुळशी तालुक्यात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी आरोपी पतीला पौड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
स्वप्निल विभिषण सावंत (वय २३ वर्ष रा. सांगवी ता.आष्टी जि.बीड) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. प्रियांका क्षेत्रे (वय 22 वर्ष) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, स्वप्नील सावंत हा मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथे एका खासगी रुग्णालयात कामाला होता. त्याने प्रियांका क्षेत्रे नावाच्या तरुणीसोबत लव्ह मॅरेज केले होते. स्वप्निल आणि प्रियांका दोन्ही कासार आंबोली येथे राहत होते. त्यानंतर स्वप्निल ज्या रुग्णालयात कामाला होता. त्याठिकाणी असलेल्या एका परिचारिका तरुणीसोबत त्याची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले.
मात्र, पहिले लग्न प्रियांका क्षेत्रे हिच्यासोबत झालेले असल्याने त्याला दुसरे लग्न करता येत नव्हते. त्याने अत्यंत भयानक पाऊल उचलत आपल्या पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पत्नीला कोणताही त्रास नव्हता. मात्र, तरी स्वप्नील हा हॉस्पिटलमधून बीपी आणि शुगरचे इंजेक्शन चोरायचा आणि तिला घरी जबरदस्ती देत राहिला. या इंजेक्शनने पत्नी प्रियांकाला त्रास होऊ लागला आणि त्यानंतर राहत्या घरीच त्याने पत्नीची हत्या केली.
दरम्यान, पत्नीचा खून करून तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा बनावही केला. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तसेच प्रियांकाच्या कुटुंबीयांनीही याबद्दल तक्रार केली. याघटनेचा पुढील तपास पौड पोलीस करत आहेत.