लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात असलेल्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दहावीचा विद्यार्थी चक्क हुक्का शाळेत घेवून गेला. आणि शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क हुक्का ओढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सदर प्रकार हा शुक्रवारी (ता.१७) दुपारच्या सुमारास घडला आहे. यामुळे लोणी काळभोर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हुक्का ओढायला लावणारा विद्यार्थी हा इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्तीत राहत आहे. सदर विद्यार्थी हा शुक्रवारी सकाळी शाळेत हुक्का घेऊन गेला. आणि शाळेच्या मधल्या सुट्टीत विद्यार्थी स्वच्छतागृहाजवळ जाऊन हुक्का ओढत होता. व तेथे आलेल्या विद्यार्थ्यांना हुक्का ओढायला लावत होता.
सदर दहावीतील विद्यार्थी हा हुक्का ओढत असून अनेक विद्यार्थ्यांना ओढायला लावत आहे. असे विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी ताबडतोब विद्यार्थ्याला पकडले. व लोणी काळभोर पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने शाळेत दाखल झाले. पोलिसांनी त्वरित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलाला समाज देऊन सोडले आहे. मात्र, याबाबत अद्यापतरी गुन्हा दाखल झालेला नाही.
लोणी स्टेशन येथील एक नावाजलेली संस्था म्हणून देखील या इंग्रजी शाळेची ओळख आहे. या खाजगी शाळेत पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरतात. या शाळेत लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेतील वर्गातच जर विद्यार्थी हुक्का ओढत असतील ती ही धोक्याची घंटा असून विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा व शाळेच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
दरम्यान, हुक्का पिणे किंवा ड्रग्स घेणे हे आता मोठ्यांचेच शौक किंवा व्यसने राहिली नसून शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही हे लोण पसरले आहे. तसेच चांगल्या घरातील मुलांनाही हे व्यसन लागले आहे. कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरात बहुतांश पान टपऱ्यांवर हुक्काचे सर्व साहित्य सहज उपलब्ध होते. त्यामुळे लोणी स्टेशन येथील एका प्रतिष्ठित खासगी शाळेत वरील प्रकार घडला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे कि नाही. असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात पडले आहेत.