पुणे : दोन चारचाकी गाड्या करारानुसार आयटी कंपन्यांना न लावता इतरत्र भाडेतत्वावर देऊन टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची १० लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना ५ सप्टेंबर २०१८ ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत फुरसूंगी येथे घडली आहे.
रमेश भगवान राठोड (वय. रा. त्रिवेनी नगर, फुरसूंगी) असे गुन्हा दाखल करण्यात आरोपीचे नाव आहे. संदीप भानुदास कणसे (वय. 38, रा. संत गजानन महाराज नगर, दिघी) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुना टुर्स अँड ट्रॅव्हल्स रेंट ए कॅब इंडिया प्रा. लि. येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. आरोपीने दोन चारचाकी गाड्या आयटी कंपन्यांना लावण्याचा करार फिर्यादी यांच्या कंपनीसोबत केला होता.
मात्र आरोपीने आयटी कंपन्यांना गाडी न लावता इतरत्र भाडेतत्वावर देऊन कंपनीला कोणतीही माहिती न देता आणि गाड्या कोठे आहेत हे देखील सांगितले नाही.
त्यानंतर त्याला कंपनीने याबाबत विचारणा केली असता, आरोपीने उडवा उडवीची उत्तरे देऊन फिर्यादी यांच्या कंपनीची १० लाख ५२ हजार ७११ रुपयांची फसवणूक केली. याबाबत फिर्यादी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रमेश राठोड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.