नाशिक : एका दिवसाची बालिका नकोशी झालेल्या क्रूर जन्मदात्यांनी जन्माला आलेल्या पोटच्या मुलीला पिशवीत कोंबून रस्त्याच्या कडेला कचऱ्यासारखे फेकून दिले असल्याची घटना नाशिक चुंचाळे परिसरात घडली आहे. या प्रकरणात त्या निरापराध बालिकेला आपला जीव गमवावा लागला असून पोलिसांनी अज्ञात मातापित्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, चुंचाळे शिवारातील,दत्तनगर मधील फ्लॅट क्रमांक 54 मधील एका घराशेजारील पाण्याच्या टाकीजवळ एक दिवसाच्या या बालिकेला रस्त्यावर फेकून देण्यात आले होते, हा प्रकार स्थानिक मुलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले, या अर्भकाचा उजवा हात, पाय गुडघ्यापर्यंत कुत्र्याने खाऊन टाकला होता, गंभीर अवस्थेत या अर्भकाला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र अतिरक्तस्राव झाल्याने चिमुकलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
या घटनेने पोलीस देखील स्तब्ध झाले असून घटनेचा पंचनामा करताना पोलीसानाच्या डोळ्यात देखील अश्रुधारा वाहत होत्या. या घटना समजताच समाज मन सुन्न झाले. या प्रकरणात संशयित महिला व एक व्यक्ती पिशवीत अर्भक घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.