पुणे : विमानाने पुण्यात येऊन मोठ्या लोकांच्या कार्यक्रमांना भेट देऊन त्यांच्याकडील महागडे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून टोळीकडून सुमारे २८ लाखांचे ३९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
असद गुलजार महंमद (वय ३२, रा. दिल्ली), निजाम बाबु कुरेशी (वय. ३५), शाहबाज भोले खान (वय. २६), राहुल लीलीधर कंगाले (वय. ३०), नदीम इब्राहिम मलीक (वय. ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावर महालक्ष्मी लॉन आहे. या लॉनमध्ये व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट आयोजित कार्यक्रमात मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. उच्चभ्रु व्यक्तींचे मोबाईल चोरी झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. विमानतळ पोलीस या चोरट्यांचा माग काढत असताना तांत्रिक तपासात टोळी दिल्लीतील असल्याची माहिती मिळाली होती.
दरम्यान,वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून या भागात पेट्रोलिंग तसेच गस्त वाढविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पथक या भागात गस्त घालत होते. यावेळी पेट्रोलिंग करताना असद महंमद हा संशयित फिरताना दिसून आला. त्याला पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने पळ काढला.
त्यानंतर एका पोलीस अंमलदाराने त्याला काही अंतरावर पाठलाग करून पकडले. चौकशी केल्यानंतर त्याने व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्टमधून मोबाईल चोरी करण्यासाठी आल्याचे सांगितले. तसेच, चार साथीदार पुणे स्टेशन येथील एका लॉजवर थांबल्याची माहिती दिली. लगेचच पथकाने लॉजवर छापा टाकून इतरांना पकडले. त्यांच्याकडून २८ लाखांचे ३९ मोबाईल जप्त केले.