पुणे : जगभरात एकीकडे महिलादिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे तर दुसरीकडे दररोज महिलांना अत्याचारांचा सामाना करावा लागत आहे. असे काही चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. यावरून महिलादिन नावालाच आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
एका महिलेला मासिक पाळी सुरू असताना तिच्याशी अघोरी कृत्य करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर तिचा छळ देखील करण्यात आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी एका २७ वर्षीय विवाहित महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या महिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे (सर्व रा. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, शारिरिक मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमांन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, विवाहानंतर महिला बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. मासिक पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले, असे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस करत आहेत.