पुणे : नराधम शिक्षकाने एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरातील एका नामांकित शाळेत घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अल्पवयीन मुलीने विमातळ पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. १८) फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाघोली येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चंदननगर परिसरातील शाळेत ऑगस्ट २०१९ मध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी चंदननगर परिसरातील एका शाळेत शिकते. तर आरोपी शिक्षक हा पीडित मुलीचे कार्यानुभव विषयाचे शिक्षक आहेत.
फिर्यादी मुलगी ही तिच्या शाळेतील वर्गात एकटी असताना याचा गैरफायदा आरोपीने घेतला. आरोपीने पीडित मुलीसबोत अश्लील चाळे करून तिच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान, याबाबत पीडित मुलीने तक्रार देताच पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे करीत आहेत.