दिपक खिल्लारे
Indapur News : इंदापूर (पुणे) : घरी सोडण्याच्या बहाण्याने एका वृद्ध आजीला मारहाण करून तिचे दागिने लुटणाऱ्या दुचाकीचालकाला इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासात बेड्या ठोकल्या आहेत. (Indapur News)
पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासात बेड्या ठोकल्या….
दिलीप लक्ष्मण अंकुश (वय ५० वर्षे, रा. सणसर, ता. इंदापूर) असे या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी औषधे खरेदीसाठी इंदापूरात आलेल्या रुक्मिणी पाडुंरंग करगळ (वय ८० वर्षे रा. वनगळी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बिजवडी ग्रामपंचायत हद्दीतील वनगळी गावच्या रहिवाशी असलेल्या रुक्मिणी पांडुरंग करगळ (वय ८०) या सकाळी गावावरून इंदापूर शहरात औषधे खरेदीसाठी आल्या होत्या. आपलं काम करून दुपारी घराकडे परतत असताना शहरातील बाब्रस पेट्रोल पंपाच्या जवळ पाठीमागून लूना गाडीवर हेल्मेट परिधान करून आलेल्या व्यक्तीने पुढे सोडतो म्हणून आजीला गाडीवर बसवले. (Indapur News)
यावेळी सरडेवाडी टोलनाक्याच्या दिशेने नेले. निर्जनस्थळी नेवून तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मंगळसूत्र, कानातील फुले असा ७० हजार रुपयाचा ऐवज, रोख रक्कम, एस. टी. बसचा पास असा मुद्देमाल त्याने लुटून नेला. दागिने ओरबाडून नेल्याने व मारहाण केल्याने त्या वृध्देच्या गाल, हात व पायांना दुखापत झाली होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. (Indapur News)
अकरा वाजता ही माहिती इंदापूर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी दवाखान्यात जाऊन त्या वृद्धेची फिर्याद घेतली. अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळास भेट दिली. कारवाईबाबत मार्गदर्शन केले. (Indapur News)
दरम्यान, मात्र गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज व तांत्रिक माहिती वरून पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, योगेश लंगुटे, सहाय्यक फौजदार प्रकाश माने, हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस शिपाई नंदू जाधव, गणेश डेरे, मोहन आनंदगावकर, होमगार्ड संग्राम माने, लखन झगडे यांनी या कारवाईत भाग घेतला.