पुणे : पुणे- सोलापूर महामार्गावर वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. २६) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात सहा लुटारूंनी चारचाकी गाडीवर गोळीबार करत ३ कोटी ६० लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवास करणारे प्रवासी, नागरिकांसह परिसरात दहशत पसरली आहे.
याप्रकरणी भावेशकुमार अमृत पटेल (वय-४० रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना राज्य गुजरात, सध्या रा. पंचरत्न बिल्डींग, मुंबई) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेशकुमार पटेल हे त्यांच्या चारचाकी गाडीतून शुक्रवारी पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याकडे निघाले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वरकुटे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या महामार्गावरील गतिरोधक आल्याने भावेशकुमार यांनी गाडी स्लो केली. त्याचवेळी अज्ञात चार अनोळखी चोरटे यांनी पायी चालत येवुन हातात लोखंडी टॉमी दाखवून गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, भावेशकुमार यांनी गाडी तेथुन भरधाव वेगात सोलापुर रोडने पुणे बाजुकडे घेवुन जात असताना त्यांनी मारूती सुझुकी कंपनीची फोर व्हिलर स्विप्ट गाडी व टाटा कंपनीची गाडी ही मधुन फिर्यादीच्या गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवित नाही. म्हणुन त्यांनी गाडीवर फायरिंग केली. गाडी रस्तामध्ये अडवुन गाडी मधुन चार चोरटे उतरून त्यांच्या साथीदाराला मारहाण केली. चोरटयांनी गाडी मधील रोख रक्कम ३ कोटी ६० लाख रुपये १४ हजाराचे दोन व १२ हजाराचा एक मोबाईल असे एकुण ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपये किंमतीचा माल जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात सहा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनास्थळी पुणे ग्रामीणचेपोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधीकारी गणेश इंगळे, सुरेशकुमार धस, गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक शेळके, भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट दिली आहे. सदर गुन्हयाचे तपाससाठी पाच पोलीस पथके तयार केली असून तपास कामी रवाना करण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी दिलीआहे.